
तळोदा/सप्त नगरी न्युज
तळोदा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील दोन छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर पदासाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अग्निविर म्हणून निवड झालेल्या छात्रसैनिकांचा महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

सत्कार समारंभात अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित माळी. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव डॉ. एच. एस. दलाल यांच्या हस्ते निवड झालेल्या छात्रसैनिकांना प्रमाणपत्र तसेच पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये भूषण प्रभाकर पाटील यांनी हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती सिलिगुडी पश्चिम बंगाल येथे झाली आहे. रोहितसिंग विजयसिंग परदेशी यांनी बॉम्बे इंजिनिरिंग प्रशिक्षण अकादमी खडकी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती हातीगढ आसाम येथे झाली आहे.
महाविद्यालयासाठी व राष्ट्रीय छात्र सेना एककासाठी ही बाब अत्यंत अभिमानाची असून, सातत्याने भारतीय सेनेत निवड होणारे छात्र सैनिक घडविल्याबद्दल सर्वांचे कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.एच. एस. दलाल यांनी देशसेवेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सैनिकांचे अभिनंदन करत, निवड झालेल्या छात्रसैनिकांना भविष्यात देशभक्ती व राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात तसेच उपस्थित छात्रसैनिकांनी या यशातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय छात्र सेना विभाग, 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेरचे समादेशक अधिकारी कर्नल अमित रे तसेच लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक यांनी देखील नियुक्त झालेल्या छात्रसैनिकांचे अभिनंदन करत बटालियनचे नावलौकिक केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.राजु यशोद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वळवी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र विभागातील सर्व कॅडेट्स उपस्थित होते.
- 1
- 0
- 0
- 0





