नंदुरबार

माळीवाड्यात पारंपरिक संस्कृतीचा जागर; ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक’ नामकरण सोहळा उत्साहात

माळीवाड्यात पारंपरिक संस्कृतीचा जागर; ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक’ नामकरण सोहळा उत्साहात

श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम; महिलांनी साकारले जुन्या परंपरांचे दर्शन, परिसरातील चौकांना महापुरुषांची नावे देण्याचा संकल्प

तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

आधुनिकतेच्या प्रवाहात लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला, संस्कृती, देशी खेळ आणि जुन्या जीवनशैलीचे जतन करण्यासोबतच महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राबविण्यात आला. पारंपरिक कला-संस्कृती व दुर्मिळ भांड्यांचे प्रदर्शन, देशी खेळ, महिला मेळावा आणि चौक नामकरण सोहळ्यामुळे मोठा माळीवाड्यात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. यावेळी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक’ या नामफलकाचे उद्घाटन महिला मंडळाच्या सचिव लीनाराणी शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

मोठा माळीवाड्यातील प्रत्येक गल्ली आणि चौकाला थोर महापुरुषांची नावे देण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. आगामी काळात परिसरातील विविध चौकांमध्ये महापुरुषांच्या नावांचे फलक लावण्यात येणार आहेत. स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव चौकाला देऊन मंडळाने त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. चौक नामकरणाच्या या उपक्रमातून महापुरुषांचे विचार आणि त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

जुन्या संस्कृतीचे जिवंत दर्शन

प्रदर्शनात पितळी, कास्य आणि मातीच्या पारंपरिक भांड्यांसह पूर्वीच्या काळातील दैनंदिन वापरातील वस्तू मांडण्यात आल्या. पाटा-वरवंट्यावर मसाला तयार करणे, मातीच्या तव्यावर चुलीवर भाकरी भाजणे, उखळावर धान्य कांडणे, जातेवरील दळण व ओव्या, सुपाने धान्य स्वच्छ करणे, गोधडी शिवणे, दही-ताक घुसळून लोणी काढणे आणि तुळशीपूजन अशा पारंपरिक पद्धतींचे सादरीकरण करण्यात आले.

आजीने बाळाला आंघोळ घालणे, अंगाईगीत म्हणणे, भागवतगीतेचे वाचन, भातुकलीचा खेळ आणि जुन्या काळातील घरगुती कामांचे चित्रण यांतून पूर्वीच्या जीवनशैलीचे दर्शन घडले. सारिपाट, लगोरी, टिपरी, गुलाबाई-गुलोजी यांसारखे देशी खेळ, पारंपरिक लोकगीते व गरबा नृत्याने प्रदर्शनाची रंगत वाढविली. खानदेशातील गौराई आणि कानबाई-राणूबाई उत्सव, वारकरी संप्रदायातील विठ्ठलपूजा तसेच प्रसिद्ध खापराची पुरणपोळी यांमधून स्थानिक संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.

महिलांच्या पुढाकारातून संस्कृती संवर्धन

या प्रदर्शनाची संकल्पना परिसरातील महिलांनी मांडली आणि सामूहिक प्रयत्नांतून ती प्रत्यक्षात आणली. प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील असंख्य महिला व पुरुषांनी उपस्थिती लावली. जुन्या वस्तू, पारंपरिक खेळ आणि घरगुती पद्धती पाहताना अनेकांना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला.

या उपक्रमात लीनाराणी शेंडे, सीमा सूर्यवंशी, नम्रता सूर्यवंशी, चेतना सूर्यवंशी, ममता सोनेरी, मनीषा सोनेरी, अर्चना शेंडे, शर्मिला राणे, कविता माळी, वंदना सूर्यवंशी, मालिनी सूर्यवंशी, सुनैना सूर्यवंशी, रुचिता सूर्यवंशी, संगीता सागर, प्रमिलाबाई सूर्यवंशी, उल्का सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी, हर्षा सूर्यवंशी, ललिता शेंडे, नर्मदा सूर्यवंशी, चंद्रकला सोनेरी, निर्मलाबाई सूर्यवंशी, नम्रता सूर्यवंशी, कल्याणी शेंडे, कुंजल माळी, माही माळी, जानवी सूर्यवंशी, लक्षिता माळी, हिरल सूर्यवंशी, जशमिता सूर्यवंशी, साची सूर्यवंशी, पलेशा सोनेरी, प्राजक्ता शेंडे आणि दिव्यानी सूर्यवंशी यांच्यासह अनेक महिला व मुलींनी सहभाग घेतला.

श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. यंदा राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या या मंडळाने पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार यांची सांगड घातली आहे. महापुरुषांचा सन्मान, महिलांचा सक्रिय सहभाग आणि जुन्या संस्कृतीचे संवर्धन या तिन्ही बाबींचा संगम असलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *