तळोद्यात गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती व पथदिवे सुरू करण्यासाठी प्रशासनास निवेदन

तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- आगामी श्री गणेशोत्सव व विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरातील नागरिक व भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भोई व सचिन भोई यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे तसेच नगराध्यक्षा श्रीमती भाग्यश्रीताई चौधरी यांना सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांची स्थिती सुरक्षित व सुरळीत असणे अत्यावश्यक आहे. मात्र, ख्वाजा नाईक चौक, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा परिसर तसेच स्मारक चौक या महत्त्वाच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे ठरत आहेत.
याशिवाय, अनेक गणेश मंडळांच्या परिसरात पथदिवे बंद अथवा नादुरुस्त अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे—
शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांच्या परिसरात अखंडित व पुरेशी प्रकाशव्यवस्था सुनिश्चित करून बंद पथदिवे त्वरित दुरुस्त करून सुरू करावेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाशयोजना करावी.
ख्वाजा नाईक चौक, बिरसा मुंडा परिसर, स्मारक चौक तसेच विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे गणेशोत्सवापूर्वीच दर्जेदार पद्धतीने बुजवून संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करावे.
रस्ते दुरुस्ती व पथदिव्यांच्या कामांची अंमलबजावणी तांत्रिक निकषांनुसार काटेकोरपणे करण्यात यावी व सक्षम अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून कामांची गुणवत्ता सुनिश्चित करावी.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी ठाम व आग्रही भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
- 0
- 0
- 0
- 0





