
तळोदा नगर परिषद कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करावे आमदार राजेश पाडवी यांची मागणी;
नगरविकास मंत्र्यांकडे लेखी निवेदन सादर
तळोदा येथील नगरपरिषद हद्दीतील चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये वाढीव कराचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनात केली आहे.

याबाबत नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार राजेश पाडवी यांना निवेदन सादर केले आहे. माझ्या मतदार संघातील तळोदा नगरपरिषद क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या व जनहितार्थ विषयाकडे वेधू इच्छितो.
सध्या तळोदा नगरपरिषद हद्दीमध्ये नगर परिषदेच्या वतीने चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, या नवीन कर आकारणी प्रक्रियेमध्ये प्रस्तावित केलेले कराचे दर हे अतिशय जास्त असल्याचे दिसते. तळोदा शहर व परिसरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती, व्यवसाय आणि उत्पन्न पाहता, हा वाढीव कर देणे सामान्य जनता, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना अत्यंत कठीण व जाचक ठरणार आहे.
या वाढीव कर दरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, यामुळे जनतेवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या या रास्त मागण्या व अडचणी आपल्याकडे पोहचवणे आवश्यक आहे.
तळोदा शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी, सुरू असलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रियेमधील वाढीव कराचे दर तातडीने कमी करण्यात यावेत. याबाबतीत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य ते फेरबदल करून कर दर कमी करण्याचे सकारात्मक निर्देश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी निवेदनात केली आहे.
- 0
- 0
- 0
- 0





