मोदलपाडा–सेलवाई रस्त्यावरील सात गाळ्यांचा पूल धोकादायक; वाहतूक बंद, नागरिकांची तातडीने नव्या पुलाची मागणी

तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
तळोदा तालुक्यातील मोदलपाडा–सेलवाई रस्त्यावरील सात गाळ्यांचा पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचला असून, पुलाच्या एका बाजूचा काँक्रीटचा पाया उघडा पडला आहे. तसेच पायाखालीलचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची शक्यता व्यक्त होत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर पूल मोदलपाडा, सेलवाई, इच्छागव्हाण यासह परिसरातील अनेक गावांची नेहमी वर्दळ असते. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शेतकरी, रुग्ण, दुचाकीस्वार तसेच माध्यमिक विद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करतात. मात्र पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत असल्याने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी व प्रवाशांना पर्याय वाहतुकीस रस्ता नसल्याने नाईलाजास्तव पुलावरून वापर करावा लागत आहे.

पुलाच्या एका बाजूचा रस्ता खचून मोठा खड्डा पडला असून पुलाचा पाया स्पष्टपणे उघडा पडलेला दिसत आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, तळोदा यांनी पुलाजवळ “धोका” असा इशारा देणारा फलक लावून पायी व वाहनांची सर्व प्रकारची वाहतूक तात्काळ बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून त्याचा फटका विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना बसत आहे.स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, पुलाची दुरवस्था अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
मात्र वेळेत दुरुस्ती न झाल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पूल पूर्णपणे धोकादायक बनला असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाकडे पुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करून दुरुस्ती अथवा नव्या पुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यायी सुरक्षित रस्त्याची व्यवस्था करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
- 0
- 0
- 0
- 0






