नंदुरबार

नंदुरबार नगर पालिकेतर्फे रेल्वे फाटका पलीकडे नवीन आधुनिक विद्युत दाहिनी स्मशानभूमी उभारण्याची मागणी

नंदुरबार नगर पालिकेतर्फे रेल्वे फाटका पलीकडे नवीन आधुनिक विद्युत दाहिनी स्मशानभूमी उभारण्याची मागणी

नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो :-  शहराच्या चारही दिशेला नवीन वसाहतींचा विस्तार वाढला आहे. निम्मे शहर रेल्वे फाटका पलीकडे वाढले असून या भागात आधुनिक विद्युत दाहिनी चा समावेश असलेली स्मशानभूमी उभारण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते गिरीश नाथानी यांनी केली आहे.


यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आणि नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा निर्मिती नंतर शहराच्या लोकसंख्येत आणि रहिवासी क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळापासून साक्री रोडवरील दंडपाणेश्वर मंदिर रस्त्यावर स्मशानभूमी आहे. कोरोना काळात नगर पालिकेने याच ठिकाणी नवीन
स्मशानभूमी उभारली. या ठिकाणी असलेल्या दाहीनी देखील आता कमी पडू लागल्या आहेत.

या ठिकाणी देखील त्यांच्या स्नानगृहासह शौचालय, पिण्याचे पाणी व अनेक सुविधांचा अभाव असून नगर पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.
संपूर्ण शहरासाठी असलेल्या एकमेव स्मशानभूमीत देखील मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर होत असतो. मात्र यावर पर्याय म्हणून विद्युत दाहिनी उभारण्यात यावी. तसेच रेल्वे फाटका पलीकडील अनेक नागरिकांना स्मशानभूमी लांब अंतरावर पडत असल्याने गैरसोयीचे ठरत आहे.

रेल्वे फटका पलीकडे एक ते सहा प्रभाग असून वाघोदा, पातोंडा, नळवा शिवारातील तसेच एकता नगर, सिंधी कॉलनी व कोरीट नाका, गुरुकुल भागातील रहिवासी नागरिकांना मयत व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी कसरत करावी लागते. उपनगर पोलीस ठाण्या प्रमाणेच रेल्वे फाटका पलीकडील अनेक वसाहतींसाठी स्वतंत्र नवीन आधुनिक स्मशानभूमी उभारण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर अंत्ययात्रेप्रसंगी नागरिकांचे हाल होत असतात. अनेक नातेवाईक बाहेर गावाहून रेल्वे अथवा बसने नंदुरबारला आल्यानंतर रेल्वे फाटका पलीकडे मयताच्या घरी जेमतेम पोहोचतात. मात्र तिथून अंत्ययात्रे साठी जाताना नागरिकांच्या हाल अपेष्टा होतात.
पर्यावरणाच्या दृष्टीने अंत्य संस्कारासाठी लाकडावर होणारा खर्च थांबवून आधुनिक विद्युत दाहिनीची स्मशानभूमी उभारणे आवश्यक आहे.
नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन 28 वर्षे झाली मात्र नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी रेल्वे फाटका पलीकडील कोणत्याही शासकीय भूखंडावर नवीन आधुनिक स्मशानभूमी लवकरात लवकर उभारण्यात यावी. याकरिता नगर पालिकेने तातडीने निर्णय घेऊन ठराव पारीत करण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते गिरीश नाथानी यांनी केली आहे.
नंदुरबार शहरातील नवीन स्मशानभूमीच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, पालकमंत्री, आमदार-खासदार यांना देण्यात आले आहे.या सर्व निवेदनांवर गिरीश नाथानी, महिला प्रतिनिधी जोली शहा यांच्यासह कमल उत्तमानी, सुंदर नाथानी, भरत माखिजा, ओम धनवाणी, हरीश मोटवानी, योगेश भक्त्यापूरी, परेश तुलसानी, भावेश मंगलानी, कृष्णा दुसेजा, दीपक पाटील, पुनम पाटील, विशाखा विष्णू पाटील आदी नागरिकांच्या सह्या आहेत.
दरम्यान रेल्वे फाटका पलीकडे नवीन स्मशानभूमीचा निर्णय तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालया समोरच मयत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्याचा इशारा
निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *