धुळे

धुळ्यात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा; 100 दिवसांच्या टीबी मुक्ती उपक्रमाचा शुभारंभ

धुळ्यात जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा;

100 दिवसांच्या टीबी मुक्ती उपक्रमाचा शुभारंभ

धुळे, दिनांक 24 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा क्षयरोग केंद्र, धुळे यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविंद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय मोरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील पीएचएन, नर्सिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची शपथ घेतली. तसेच ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान 2.0’ अंतर्गत जिल्ह्यात 100 दिवसांच्या विशेष उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे नागरिकांना ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरणही करण्यात आले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. रांगोळीद्वारे ‘टीबीमुक्त धुळे’ ही संकल्पना साकारण्यात आली. तसेच नर्सिंग विद्यार्थ्यांनी क्षयरोग विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पीपीएम समन्वयक प्रतिभा पाटील यांनी केले. जिल्हा कार्यक्रम कोऑर्डीनेटर डॉ.मोहिनीराज देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकास्तरावर जनजागृती रॅली, आशा सभा, माहिती पुस्तिकांचे वाटप, तसेच कम्युनिटी मिटिंग्स यांसारखे विविध उपक्रमही राबविण्यात आले, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *