
सुरक्षित प्रसूती सेवेत उत्कृष्ट कार्य
धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांचा राज्यस्तरीय सन्मान
धुळे, दि. 11 मार्च, (जिमाका वृत्त) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील आरोग्य सेविकांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील दोन आरोग्य सेविकांना उपकेंद्र स्तरावर सुरक्षित प्रसुती सेवा प्रभावीपणे राबविल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील उपकेंद्र सुळे येथील ज्योती यशवंत मोरे, गॉर्डर मार्गरेट मार्टिन (उपकेंद्र बभळाज, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी सुरक्षित प्रसुती सेवा प्रभावीपणे राबवत ग्रामीण व दुर्गम भागातील मातांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे.
सन 2024-2025 या कालावधीत श्रीमती मोरे यांनी उपकेंद्रात 259 प्रसुती, तर श्रीमती मार्टिन यांनी 212 प्रसुती यशस्वीपणे केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपकेंद्र स्तरावर सुरक्षित प्रसुती सेवा उपलब्ध करून देत मातृ व नवजात शिशु आरोग्य सुधारण्यासाठी दोन्ही आरोग्य सेविकांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविका समर्पित भावनेने मातृ व बाल आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी कार्य करत आहेत. उपकेंद्र स्तरावर सुरक्षित प्रसुती सेवा उपलब्ध करून देणे हे ग्रामीण भागातील मातांसाठी मोठे बळ आहे.
ज्योती मोरे व गॉर्डर मार्गरेट मार्टिन यांना मिळालेला राज्यस्तरीय सन्मान हा धुळे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्याचा गौरव आहे. त्यांच्या कार्यामुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल.
— डॉ. सचिन बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
- 0
- 0
- 0
- 0





