
राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची नेमणूक करावी – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
धुळे, दि. 30 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम ( एसआयआर) राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलअे) नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज दुपारी संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते बोलत होत्या. या बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, नायब तहसिलदार धमेंद्र पाटील, प्रदीप गांगुर्डे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, भारत निवडणूक आयेागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. त्यानुसार विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करणे व वेळोवेळी अद्यावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येण्याकरीता राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलअे) च्या नियुक्तीबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करुन नेमलेल्या प्रतिनिधींची यादी संबंधित मतदार नोदंणी अधिकारी यांच्याकडे सादर करावी.

नागरिकांनी आपले नाव 2002 च्या मतदार यादीत नाव शोधण्याकरिता https://ceoelection.maharashtra.gov.in/2002/2002rolldata.aspx किंवा https://voters.eci.gov.in/ तसेच https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यावेळी केले.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.तळपाडे यांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देतांना सांगितले की, दि.29 मार्च, 2026 पर्यंत जिल्ह्यात पुरुष मतदार 9 लाख 59 हजार 584, स्त्री मतदार 9 लाख 26 हजार 412 तसेच तृतीयपंथी 67 असे एकूण 18 लाख 86 हजार 63 मतदार आहेत. त्यापैकी 9 लाख 69 हजार 669 मतदारांचे मॅपिंग झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
- 0
- 0
- 0
- 0





