
फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे निवासी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो कृषी विभाग, पानी फाउंडेशन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे यशस्वीरीत्या पार पडले.

प्रशिक्षणासाठी रवाना होण्यापूर्वी बस स्थानकावर आयोजित उद्घाटनप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी कोरडे व वळवी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रशिक्षणात नंदुरबार तालुक्यातील 33 गावांमधून एकूण 47 शेतकरी बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तीन दिवसांच्या प्रशिक्षण काळात गटशेती, सामूहिक नियोजन, नेतृत्व विकास तसेच शाश्वत शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उप कृषी अधिकारी सुधीर पाटील यांनी प्रशिक्षणादरम्यान पूर्णवेळ उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उमेद अभियानाच्या वतीने प्रभाग समन्वयक सौ. पूजा राठोड यांनीही सहभाग नोंदवला.
प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासात बसमध्येच शेतकऱ्यांनी गटबांधणी व पुढील नियोजनास सुरुवात केली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नंदुरबार तालुक्यात गटशेतीची चळवळ अधिक बळकट होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
FarmerCup2026 #GroupFarming #KrushiVibhag #PaaniFoundation #collectorofficenandurbar
- 0
- 0
- 0
- 0





