नंदुरबार

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा योजनेंतर्गत ‘मशरूम शेती शाळा’ उपक्रमाची यशस्वी सांगता

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा योजनेंतर्गत ‘मशरूम शेती शाळा’ उपक्रमाची यशस्वी सांगता

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) योजनेअंतर्गत सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या ‘मशरूम शेती शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची यशस्वी सांगता झाली. या उपक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा  दीपक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तळोदा तालुका कृषी अधिकारी श्रीमती मीनाक्षी वळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या शेती शाळेमध्ये कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व अनुभवी मशरूम शेती मार्गदर्शक  राजेंद्र वसावे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चार सत्रांमध्ये मशरूम शेतीचे तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, उत्पादन वाढीचे उपाय, खर्च–नफा गणित तसेच बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. मशरूम शेती ही कमी भांडवलात, कमी जागेत व कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारी शेती पद्धत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.

या प्रशिक्षणामध्ये मशरूम शेतीसाठी आवश्यक साहित्य, कच्चा माल, प्रक्रिया पद्धती तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला. शेतकऱ्यांना केवळ सैद्धांतिक माहिती न देता ‘करून शिकणे’ या संकल्पनेवर भर देण्यात आला.

हा उपक्रम मोड पुनर्वसन गावात शेतकरी सौ. वंताबाई रमेश वसावे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा. मंडळ कृषी अधिकारी श्री. बी. एन. माळी, उप कृषी अधिकारी श्री. एस. डी. दाणी, सहायक कृषी अधिकारी श्रीमती ज्योती गावित तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) श्री. विपुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चारही सत्रे पार पडली. सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना मशरूम शेतीकडे पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, शेतीला जोडधंद्याच्या माध्यमातून उत्पन्नवाढ साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शेतीतील नवकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभाग व आत्मा योजनेचे आभार मानले असून, भविष्यातही असे प्रशिक्षण उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ATMA #collectorofficenandurbar

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *