Business नंदुरबार

सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा

सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा

नंदुरबार | दि. 22–23 सप्त नगरी न्युज ब्युरो

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने दोन दिवसीय सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व विज्ञान आश्रम, पाबळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडला.

उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री. दीपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार उपस्थित होते. ग्रामीण भागात सोलर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चात उद्योग उभारण्याची मोठी संधी असून महिला व युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी मार्गदर्शनात नमूद केले.

प्रमुख अतिथी श्री. तानाजी खर्डे, कृषी उपसंचालक, नंदुरबार यांनी सोलर ड्रायरच्या वापरामुळे अन्नप्रक्रिया उत्पादनाचा दर्जा वाढतो, साठवण क्षमता सुधारते व शेतमालाचे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, असे सांगितले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे श्री. जयंत उत्तरवार, श्री. उमेश पाटील तसेच विज्ञान आश्रमाचे डॉ. रणजीत श्यामबाग, श्री. प्रसाद पाटील व कु. ज्ञानेश्वरी वारुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात जिल्ह्याच्या हवामानानुसार सोलर ड्रायर उपयुक्त ठरणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रात सोलर ड्रायरचे प्रकार, रचना, कार्यपद्धती, विविध फळे-भाज्यांचे सुकविण्याचे तंत्र, उत्पादन खर्च, नफा-तोट्याचे गणित तसेच मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  पॅकेजिंग, लेबलिंग, साठवण व विक्री पद्धतींची प्रत्यक्ष उदाहरणेही दाखविण्यात आली.

धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, तळोदा व शहादा तालुक्यातील महिला, युवक व बचत गट प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणामुळे घरगुती स्तरावर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व आत्मविश्वास मिळाल्याचे प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण व स्थानिक रोजगारनिर्मिती या उद्दिष्टांना बळ मिळाले आहे.
.
.
.

SolarFoodProcessing #Nandurbar #SelfEmployment #WomenEmpowerment #GreenTechnology #KVKNandurbar #SustainableDevelopment #RuralLivelihood #SolarDryer

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *