प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट
स्थानिक विकास, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीवर भर

शहादा |सप्त नगरी न्युज ब्युरो
प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन पर्यावरणीय बाबी, वाहतूक व्यवस्थापन तसेच स्थानिक नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या सूचनांवर भर देण्यात आला.

भेटीदरम्यान सूचित करण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे:
- सिमेंट उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारी धूळ (Dust) कारखान्याच्या परिसरात तसेच लगतच्या शेतजमिनीवर पडणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- सिमेंट व कच्चा माल वाहतुकीचे नियोजन प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत करावे, जेणेकरून दिवसा मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
- कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगारनिर्मिती होणे अपेक्षित असून, त्यासाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
- उद्योग सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले.
- मुख्य रस्त्यापासून कारखान्यापर्यंत दर्जेदार व सुरक्षित रस्ता विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
- ग्रामपंचायतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी CSR फंडाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांच्या या भेटीमुळे औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, वाहतूक शिस्त व ग्रामविकास या बाबींना समान महत्त्व देण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. औद्योगिक प्रगती ही स्थानिक नागरिकांच्या हिताशी सुसंगत असावी, या उद्देशाने प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
#Collector Office Nandurbar#IndustrialDevelopment #LocalEmployment #EnvironmentalSafety
- 0
- 0
- 0
- 0





