नंदुरबार

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम

नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती

नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो

शीख धर्मातील महान गुरू, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षनिमित्त धर्मस्वातंत्र्य, मानवता, परोपकार, सेवा, साधेपणा व सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा गौरवशाली इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा, आश्रमशाळा तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभातफेरी, रॅली, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, गीतगायन, रांगोळी, निबंध स्पर्धा, डॉक्युमेंटरी व प्रेरणादायी गीतांचे प्रसारण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळास्तरावर राबविण्यात आलेले प्रमुख उपक्रम:
प्रभातफेरी व रॅली:
विद्यार्थ्यांच्या हातात फलक, घोषवाक्ये, भित्तीपत्रके घेऊन सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात ‘हिंद दी चादर’ संकल्पनेची जनजागृती करण्यात आली.

डॉक्युमेंटरी व प्रेरणादायी गीतांचे प्रसारण:
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर आधारित डॉक्युमेंटरी तसेच पंजाबी पार्श्वगायक श्री सतिंदर सरताज यांचे प्रेरणादायी गीत शाळांमध्ये दाखविण्यात आले.

स्पर्धात्मक उपक्रम:
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव व मूल्यसंस्कार रुजावेत यासाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.


जि.प. प्राथमिक शाळा नवागाव, ता. तळोदा येथे प्रभातफेरी, घोषवाक्ये व आदरांजली कार्यक्रम पार पडला. जि.प. उच्च प्राथमिक शाळा बुधावल, ता. तळोदा येथे रॅली व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नवापूर, जि.प. शाळा उमरपाडा (ता. अक्कलकुवा), जि.प. शाळा दुधाळे, जि.प. शाळा गुजर जांभोली, जि.प. शाळा कात्रा, जि.प. शाळा घुली, नवजीवन विद्यालय वाघाळे, माध्यमिक विद्यालय वडसत्रा, माध्यमिक विद्यालय लक्कडकोट, श्रीमती सरीबेन पाटील माध्यमिक विद्यालय ब्राह्मणपुरी, ज्ञान प्रबोधिनी विद्या मंडळ, देवमोगरा आमली (ता. अक्कलकुवा) आदी शाळांमध्ये प्रभातफेरी, चित्रकला, निबंध व विविध जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात राबविण्यात आले.

या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्षता, बलिदान, मानवता, राष्ट्रप्रेम, सामाजिक सलोखा व ऐतिहासिक जाणीव यांचे महत्त्व प्रभावीपणे समजावून देण्यात आले.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे जीवन व बलिदान हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण, इतिहासाची जाणीव व सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

#Collector Office Nandurbar#hinddichadar #shrigurutegbahadurji #350shahidisamagam #nandurbar #ValueEducation #CulturalHeritage

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *