नंदुरबार

सातपुड्यातील बरडी गावात भीषण अग्नितांडवतीन घरे जळून खाक; आदिवासी कुटुंब उघड्यावर, मदतीचा हात पुढे

सातपुड्यातील बरडी गावात भीषण अग्नितांडव
तीन घरे जळून खाक; आदिवासी कुटुंब उघड्यावर, मदतीचा हात पुढे

अक्कलकुवा|सप्त नगरी न्युज ब्युरो
सातपुड्याच्या अतिदुर्गम दोऱ्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बरडी (ता. अक्कलकुवा) येथे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील तीन घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ऐन थंडीच्या दिवसांत संबंधित आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे.

                          दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता समसा मिठ्या पाडवी, अनिल समसा पाडवी व विलास समसा पाडवी या तिघांची घरे एका रांगेत होती. ही सर्व घरे लाकडी व कौलारू छपराची होती. घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी बाहेर गेलेले असताना अचानक एका घराला आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले व बाजूची इतर दोन घरेही आगीच्या कचाट्यात सापडली.
घरालगतच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना घरातून आगीचे लोळ बाहेर येताना दिसताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र वस्ती दुर्गम भागात असल्याने व आगीची तीव्रता प्रचंड असल्यामुळे ग्रामस्थ काहीच करू शकले नाहीत. डोळ्यादेखत आयुष्यभराची पुंजी, धान्यसाठा व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

                   संवेदनशीलतेतून मदतीचा पुढाकार या दुर्घटनेनंतर “एक हात मदतीचा” या भावनेतून बरडी गावातील नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थ मित्र मंडळाने पुढाकार घेतला. तसेच शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, वस्त्र व आर्थिक स्वरूपात मदत केली.
               यावेळी मित्र परिवार बर्डी मुहली माता ग्रुपचे सदस्य रमेश तडवी, फुलसिंग तडवी, भीमसिंग तडवी, दिलीप राऊत, तिरसिंग राऊत, राजेंद्र वसावे, जगदीश आबा तडवी, सरदार तडवी, नरेंद्र तडवी, संगीता राहसे, अनिल राहसे तसेच शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष आर. के. तडवी, कार्याध्यक्ष महेश पाटील, तळोदा प्रकल्प अध्यक्ष भरत वसावे व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी घटनाग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले असून, शासन स्तरावरून अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *