
मधुमक्षिका पालनातून शाश्वत शेती व उत्पन्नवाढीस चालना
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला भेट

नंदुरबार | दि. 08 सप्त नगरी न्युज ब्युरो
नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत शेती, उत्पन्नवाढ आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या माध्यमातून मौजे पालिपाडा, ता. नवापूर येथे राबविण्यात आलेल्या रबी हंगामातील अजवाइन पिकावर आधारित मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिकाचे त्यांनी सखोल निरीक्षण केले.

यावेळी गुजरातमधील सोलदरा येथील प्रगत मधपालक सौ. अस्मिताबेन पटेल (६,००० मधपेट्या, वार्षिक सुमारे १५० टन मध उत्पादन) तसेच अहिल्यानगर येथील श्री. राजू कानवडे यांनी नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या मधुमक्षिका पालन उपक्रमांची माहिती दिली. सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतात २०० हून अधिक मधमाशी पेट्या ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. मित्ताली सेठी यांनी मधुमक्षिका पालनाचा फ्लोरा कॅलेंडर, विविध पिकांच्या परागीभवनासाठी मधपेट्यांचा भाडेतत्त्वावरील वापर, जिल्ह्यात स्थानिक मधपालकांची संख्या वाढवणे आणि ‘नंदुरबार शुद्ध मध’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरीय आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. प्रात्यक्षिकादरम्यान त्यांनी स्वतः मधपेटी हाताळणी व हस्तचालित यंत्राद्वारे मध काढणी करत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादात मधुमक्षिका पालन हे केवळ मध उत्पादनापुरते मर्यादित नसून, परागीभवनामुळे पिकांचे उत्पादन, गुणवत्ता व उत्पन्न वाढविणारे प्रभावी साधन असल्यावर भर देण्यात आला. मध, मेण, रॉयल जेली, परागकण यांसारख्या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी असल्याने हा उद्योग ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत शेती व मधुमक्षिका पालनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
.
.
.
Nandurbar #Beekeeping #मधुमक्षिका_पालन #SustainableAgriculture #FarmerEmpowerment #KVKNandurbar #RuralDevelopment #OrganicHoney #Pollination #DrMittaliSethi
- 0
- 0
- 0
- 0





