नंदुरबार

पेसा दिवसाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा येथे पेसा मोबीलायझर व सामूहिक वनहक्क समित्यांचे प्रशिक्षण

नंदुरबार /सप्त नगरी न्युज ब्युरो

पेसा दिवसाच्या अनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या माध्यमातून सर्व पेसा मोबीलायझर तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांसाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश जिल्ह्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या वनसंपदा अ‍ॅपच्या माध्यमातून वैयक्तिक व सामूहिक वनहक्क धारकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हा होता.

जिल्ह्यात वनहक्क संदर्भात सुरु झालेल्या वनसंपदा अ‍ॅपद्वारे वनपट्टे धारकांचा सविस्तर सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याने, पेसा मोबीलायझर यांना या अ‍ॅपचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच राष्ट्रीय पेसा दिनी ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

पेसा मोबीलायझर प्रशिक्षणातील महत्त्वाच्या बाबी:

  1. वैयक्तिक वनहक्क धारकांची सर्व प्रोफाइल माहिती (आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, फोटो इ. अ‍ॅपवर अद्ययावत करणे
  2. शेतजमिनीची सविस्तर माहिती GIS नकाशासह संकलित करणे
  3. उपलब्ध कागदपत्रांची नोंद करणे
  4. लाभ घेतलेल्या योजनांची माहिती संकलित करणे
  5. भविष्यात आवश्यक असलेल्या योजनांची माहिती नोंदवणे

सामूहिक वनहक्क समित्यांना देण्यात आलेले मार्गदर्शन:

  1. अ‍ॅपवर सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांची माहिती अद्ययावत करणे
  2. ग्रामसभेत समितीतील आवश्यक बदलांसाठी मार्गदर्शन
  3. CFR क्षेत्राचे सीमांकन करणे
  4. आतापर्यंत झालेल्या व प्रस्तावित कामांची नोंद
  5. मनरेगा अंतर्गत कामांची मागणी व अंमलबजावणी यंत्रणा जाहीर करण्याबाबत मार्गदर्शन
  6. पेसा दिनी होणाऱ्या ग्रामसभेत वनहक्क कायद्याचे बारकावे, आराखड्याचे वाचन व पेसा निधीच्या वापराबाबत चर्चा

या प्रशिक्षणात गट विकास अधिकारी मा. अहिरे, तालुका पेसा समन्वयक, प्रकल्प समन्वयक अमोल राठोड, वनहक्क लिपिक तुषार झुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे अक्कलकुवा तालुक्यात वनसंपदा पोर्टलवरील सर्वेक्षणाला गती मिळून सामूहिक वनहक्क समित्या अधिक सक्षम होतील तसेच पेसा कायदा १९९६ व वनहक्क कायदा २००६ यांची प्रभावी अंमलबजावणी वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

PESADay #ForestRightsAct #TribalDevelopment #PESAMobilisers

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *