वाचनातून ज्ञानसमृद्धीकडे : शाळेत पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो
नंदुरबार येथील स्वा. सै. श्री. गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच शाळेत वाचनसंस्कृती अधिक बळकट व्हावी या उद्देशाने पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तीन दिवस चाललेल्या या पुस्तक विक्री स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या आनंदाने सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सचिन गोसावी (शिक्षण विस्तार अधिकारी), मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे,पुस्तकप्रेमी मंगेश उपासनी , सौ पुनम गिरी व भद्रेश त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी पुस्तकाचे शैक्षणिक व संस्कारक्षम महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानकक्षांचा विस्तार व्हावा आणि पुस्तकांशी नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने हा पुस्तक विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार व वयोगटानुसार उपयुक्त पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.अशी भावना व्यक्त केली. त्याच अनुषंगाने शाळेच्या पुस्तक दानपेटीत विद्यार्थ्यांनी वाचलेली पुस्तके शाळेला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः वाचलेली पुस्तके आनंदाने दानपेटीत अर्पण केली, ज्यामुळे शाळेच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर पडली.

यावेळी प्राची विनायक शिंदे या विद्यार्थीनीने वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट या उपक्रमा अंतर्गत “गड किल्ले” व “मी” हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते शाळेत भेट देण्यात आले .अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक भेट देण्याची व ज्ञानवाटपाची सवय रुजते, असे मत व्यक्त करण्यात आले.

प्रमुख अतिथी सचिन गोसावी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वाचनातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भाषिक व नैतिक विकास घडतो, असे सांगितले. लहान वयात वाचनाची सवय लागल्यास व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास व चिंतनशक्ती वाढीस लागते, असे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात “माझ्या आवडत्या पुस्तकाचे मनोगत” या उपक्रमांतर्गत निलेश बागुल यांनी “विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी ६०५ जादुई विचार” या पुस्तकाविषयी प्रभावी मनोगत व्यक्त केले. या मनोगतातून सकारात्मक विचारांचे महत्त्व अधोरेखित झाले.
या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक, बोधप्रद, कथात्मक व ज्ञानवर्धक पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने पुस्तक खरेदी करत वाचनप्रेम व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाचे फकिरा माळी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितेश नाथजोगी, सौ. छाया मराठे, शिक्षकवृंद व शालेय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे शाळेत वाचनसंस्कृतीला नवी दिशा मिळाली असून पालक व विद्यार्थ्यांकडून उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
- 0
- 0
- 0
- 0





