नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत अभियान’; युवकांचा जनजागृतीचा संकल्पJOSH उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग; उत्कृष्ट स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

तळोदा महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत अभियान’; युवकांचा जनजागृतीचा संकल्प
JOSH उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग; उत्कृष्ट स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

           तळोदा (नंदुरबार) |सप्त नगरी न्यूज ब्युरो: देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना’अंतर्गत तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘JOSH’ (Joint Squad for Health) अर्थात आरोग्यविषयक संयुक्त पथक या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांची ऊर्जा आणि जनसहभागाची ताकद एकत्र आणून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

                नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या समन्वयातून निक्षय भारत उपक्रम तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

            कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाची सुरुवातीची लक्षणे, शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत वैद्यकीय तपासण्या, NAAT या आण्विक चाचणीचे महत्त्व आणि रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

             क्षयरुग्णांना उपचारादरम्यान सकस आहार मिळावा, यासाठी शासनाच्या निक्षय पोषण योजनेची माहितीही त्यांनी दिली. तसेच क्षयरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करून क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी मदत आणि मानसिक आधार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते टीबी मुक्त भारत अभियानासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महाविद्यालयीन स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी मुकेश कापूरे यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक जनजागृती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.

दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत जनजागृती पोहोचविण्याची शपथ
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागांमध्ये क्षयरोगाविषयी जागृती निर्माण करण्यासह शासकीय आरोग्य योजनांची माहिती पोहोचविण्याची शपथ एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात वैद्यकीय तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. मोफत तपासण्या, औषधोपचार आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध आरोग्य सेवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. राजू यशोद यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका उषा वसावे, प्रा. डॉ. रामचंद्र परदेशी, डॉ. प्रमोद जाधव, प्रा. स्नेहल वसावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल चौधरी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे, जिल्हा क्षयरोग समन्वयक राहुल वळवी आणि पी.पी. समन्वयक समुवेल मावची उपस्थित होते.
तसेच आरोग्य विभागाचे अनिल पाटील, मनोज भावसार, रामचंद्र बारी, कौस्तुभ बडोदेकर, बाळू पाटील, इम्रान पठाण, किशोर आणि एनसीसीचे सिनियर कॅडेट्स पार्बती पावरा, वर्षा वळवी व अविनाश नाईक यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *