नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा

नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा

नंदुरबार, दि. १९ सप्त नगरी न्यूज ब्युरो :– महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास OBC मधून आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या न्या. शिंदे समितीला राज्यभरात ५८ लाख ८२ हजार ३६५ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या नोंदी नगरपरिषद, नगरपंचायत, तलाठी व ग्रामसेवक कार्यालयांवर प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना नंदुरबार जिल्ह्यात अद्यापही या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हजारो मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित राहत असून हा प्रकार अत्यंत अक्षम्य असल्याची टीका नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळाने केली आहे.

या प्रकरणी मंडळाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या ७ दिवसांत याद्या प्रसिद्ध करण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत
नंदुरबार जिल्ह्यात शोधलेल्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी नोंदींची यादी तात्काळ ग्रामपातळीवर प्रसिद्ध करावी.
सर्व नोंदींची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) तसेच महा-ई-सेवा व सेतू केंद्रावर मोफत उपलब्ध करून द्यावी.
गावपातळीवर वंशावळ पडताळणी, अर्ज भरणे आणि प्रमाणपत्र वाटपासाठी महसूल विभागामार्फत विशेष शिबिरांचे (Camps) आयोजन करावे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ आदेश द्यावेत.

सदर मागण्यांवर ७ दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे.

अशा आशयाचे निवेदन मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग महादू मराठे, उपाध्यक्ष शांतीलाल गायकवाड, सचिव अनिल वायकर, सुनील चव्हाण, ईश्वर काळे यांनी मंडळाच्या वतीने
दिले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *