
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तळोदा शिवसेना शहर कार्यालयात अर्ज सादर करावे – शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे
पात्र मुलींना टप्प्याटप्प्याने मिळणार १ लाख १ हजार रुपयांचे अर्थसहाय्य
तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लेक लाडकी योजना’ योजनेचा तळोदा शहरातील पात्र कुटुंबांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र शिवकुमार दुबे व नगरसेविका सौ. प्रतीक्षा जितेंद्र दुबे यांनी केला आहे.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, तळोदा शहरात शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी नागरिकांना या योजनेची माहिती देत सदर योजनेचा लाभ मिळावा यासाठी “मुलगी वाचवा… मुलगी शिकवा… मुलगी घडवा…” हा संदेश दिला. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांचे शिक्षण, आरोग्य व आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे.
सदरचा या योजनेत १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना याचा लाभ मिळू शकतो. योजने अंतर्गत पात्र लाभार्थी मुलीला जन्मापासून वयाच्या १८ वर्षांपर्यंत विविध टप्प्यांवर एकूण १ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ६ हजार रुपये, इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ७ हजार रुपये, इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ८ हजार रुपये, तर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये अशा पद्धतीने हे अर्थसहाय्य देण्यात येते.
मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे तसेच मुलींचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा प्रमुख व ठळक उद्देश आहे.
उपलब्ध शासनाच्या माहितीनुसार, पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील एक किंवा दोन मुलींना, आवश्यक पात्रता अटी पूर्ण केल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी सदरचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे तसेच शासनाने निर्धारित केलेल्या उत्पन्नाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, मुलीचे व पालकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखला तसेच आवश्यकतेनुसार कुटुंब नियोजन प्रमाणपत्र व स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
तळोदा शहरातील पात्र नागरिकांच्या सोयीसाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला तसेच योजनेचा अर्जाचा फॉर्म शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भोई गल्ली, तळोदा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र पालकांनी या योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे जितेंद्र शिवकुमार दुबे व नगरसेविका सौ. प्रतीक्षा जितेंद्र दुबे यांनी केले आहे.
“मुलगी वाचवा… मुलगी शिकवा… मुलगी घडवा…” या संदेशातून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
- 0
- 0
- 0
- 0





