
मेडेव्हिजनच्या ‘सेवानुभूती’ शिबिरातून नंदुरबारच्या जनजाती भागात आरोग्यसेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदाच्या मेडेव्हिजन आयामांतर्गत आयोजित ‘सेवानुभूती’ या उपक्रमाच्या माध्यमातून खानदेश व मराठवाड्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मागील तीन वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील जनजाती भागात जाऊन आरोग्यसेवा, सामाजिक अभ्यास व जनजागृतीचे कार्य करत आहेत. यावर्षी हे निवासी शिबिर रांझणी (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथे उत्साहात संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. बरखा पाडवी, अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अमोल मराठे, प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे आणि मेडेव्हिजन देवगिरी प्रदेश संयोजक डॉ. ललित सोनार यांच्या हस्ते झाले.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रांझणी गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्यात आले. तसेच नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या सिकल सेल आजाराविषयी जनजागृती, त्याचे निदान, प्रतिबंध आणि वेळेवर उपचाराचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. दिवाकर कुळकर्णी यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली. शहरातील सेवावस्ती तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागात त्यांनी केलेल्या दीर्घकालीन आरोग्यसेवेचा प्रवास, त्यामागील प्रेरणा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा उलगडा या संवादातून झाला. वैद्यकीय विद्यार्थ्यांना समाजाभिमुख डॉक्टर म्हणून घडण्यासाठी हा संवाद प्रेरणादायी ठरला.
शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास व संघटन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रा. भरत सोनार यांनी टीम बिल्डिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच वाद-विवाद स्पर्धा, पारंपरिक खेळ, योग व व्यायाम प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संघभावना आणि सामाजिक संवेदनशीलता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जनजाती लोकसंख्या असलेला जिल्हा असून येथील आरोग्यविषयक आव्हाने समजून घेणे ही आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी आहे. मागील तीन वर्षांपासून ‘सेवानुभूती’च्या माध्यमातून आम्ही केवळ आरोग्य शिबिरे आयोजित करत नाही, तर स्थानिक आरोग्य व्यवस्था, जनजाती समाजाची जीवनशैली, पोषण, सिकल सेलसारख्या स्थानिक आरोग्य समस्यांचा अभ्यास आणि आरोग्यसेवेतील अडचणी प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत”. प्रदेश मेडेव्हिजन संयोजक ललित सोनार म्हणाले की,”भविष्यात समाजाभिमुख, संवेदनशील आणि ग्रामीण भारताच्या गरजा समजणारे डॉक्टर घडावेत, हा या उपक्रमामागील मूलभूत उद्देश आहे.”
शिबिराचा समारोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश संघटन मंत्री श्री. सिद्धेश्वर लटपटे यांच्या मार्गदर्शनाने झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवा, संवेदनशीलता आणि राष्ट्रनिर्मिती या मूल्यांशी निष्ठावान राहून वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्याचे आवाहन केले.
या शिबिरात देवगिरी प्रदेशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजसेवा आणि आरोग्य जनजागृतीचा संदेश जनजाती भागापर्यंत पोहोचविला.
- 1
- 0
- 0
- 0





