
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं एकदिवसीय धरणं आंदोलन
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेतर्फे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आज रत्नागिरीत एकदिवसीय लाक्षणिक निदर्शनं करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या धरणं आंदोलनात जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक पाऊल न उचलल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
“२०२५-२६ च्या चालू हंगामात आंब्याचे २० टक्केही उत्पादन झालेले नाही, हे सरकारी आकडेवारीच सांगत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धाच्या परिस्थितीमुळे यंदा आंब्याला अत्यंत कमी दर मिळाला. शासनाचा आंबा शेतीबद्दलचा नियोजनशून्य कारभार आणि उदासीनता यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांचे कंबरडे पार मोडून गेले आहे, अशी भुमिका संस्थेचे अध्यक्ष विवेक भिडे आणि सचिव मुकुंदराव जोशी यांनी मांडली.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे:
यंदा उत्पादन २० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने सरकारने सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे आणि हेक्टरी ५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.
वानर, माकड आणि इतर वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सरकारने ठोस धोरण तयार करावे.
कोकणातील आंबा व इतर शेतीमालाला हक्काचा हमीभाव मिळाला पाहिजे.
कोकणात प्रदूषणकारी कारखाने आणि अणुऊर्जा प्रकल्प अजिबात नकोत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
कोकणात कृषी संवर्धन, कृषी पर्यटन, मत्स्यसंवर्धन आणि पशुसंवर्धन या व्यवसायांना गती देणारे पर्यावरणपूरक उद्योग सुरू करावेत.
- 0
- 0
- 0
- 0





