नंदुरबार

तळोदा वाढीव मालमत्ता कर विरोधात नागरिकांचा वतीने शिवसेनेत तर्फे पालिकेवर मोर्चा

तळोदा वाढीव मालमत्ता कर विरोधात नागरिकांचा वतीने शिवसेनेत तर्फे पालिकेवर मोर्चा

करवाढ रद्द करण्याची मालमत्ता धारकांची मागणी

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-                          तळोदा येथील नगरपालिकेकडून २०२५-२६ या वर्षासाठी आकारण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाढीव करवाढ रद्द करावी या मागण्यासाठी शिवसेना (शिदे गट) शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ताधारकांची बैठक घेण्यात आली. तदनंतर नागरिकांनी मोर्चा काढत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

मेन रोडवरील बालाजी वाड्यात आयोजित बैठकीला नगरसेविका रत्नताई चौधरी, प्रतीक्षा दुबे, विद्याताई चौधरी, ज्योती भोई, जयेश सूर्यवंशी, कल्पेश सूर्यवंशी, नितेश सोनार, सुभाष चौधरी, जगदीश परदेशी, शुभम माळी, कल्पेश माळी, योगेश पाडवी, राजन पाडवीयांच्यासह शहरातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. बैठकीनंतर नागरिकांनी मेन रोडवरून स्मारक चौक मार्गे तळोदा नगरपालिकेपर्यंत मोर्चा काढला.

यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात वाढीव घरपट्टी अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला. नगरपालिकेने पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी शैक्षणिक कर, आरोग्यविषयक कर तसेच वृक्षकराबाबतही आक्षेप नोंदवला. शहरात नगरपालिकेच्या शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसताना असे कर आकारले जात असल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच शहरातील अनेक भागांत नागरिकांनी स्वतः झाडे लावून त्यांचे संवर्धन केले असताना वृक्षकर आकारण्याचे कारण काय, असा सवालही करण्यात आला. हद्दवाढीतील नव्या वसाहतींमध्ये अद्याप

मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अनेक भागांत रस्ते, गटारी, पथदिवे तसेच स्वच्छतेच्या सुविधा अपुऱ्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि साफसफाईच्या कामांबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

याशिवाय, घरांची मोजणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी संस्थेने योग्य प्रक्रिया न पाळल्याचा आरोप करण्यात आला. अनेक मालमत्ताधारकांना पूर्वसूचना न देता मोजणी करण्यात आली. काही ठिकाणी बंद घरे व दुकाने केवळ छायाचित्रांच्या आधारे

मोजण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील इतर कोणत्याही नगरपालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढ करण्यात आलेली नसल्याचे सांगत नागरिकांनी तळोदा नगरपालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास शहरातील नागरिकांसह व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर शहरातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *