नाशिक

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासावी : अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासावी : अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण

मालेगाव, दि. 15 जून, 2026 (उमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासल्यास भविष्यात त्यांचा आत्मविश्वास व विचारशक्ती वाढते. तसेच भाषेविषयी गोडी निर्माण होऊन समाजाबद्दल संवेदनशीलता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती व सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचनाची सवय लावून वाचन संस्कृती जोपासावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी केले.

अजंग (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित शालेय प्रवेशोत्सव कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच तुषार आहिरे, उपसरपंच रोशनी सूर्यवंशी, मुख्याध्यापिका उषा शेलार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण म्हणाले की, शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांच्यामध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी. वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.

कष्टाशिवाय यश मिळत नाही आणि मेहनतीशिवाय उज्ज्वल भविष्य घडत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मेहनत व कष्ट करण्याची सवय लावावी. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवानिमित्त अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शाळेची माहिती जाणून घेतली तसेच विविध अडीअडचणींबाबतही चर्चा केली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *