
खरीप हंगाम पूर्वतयारी व इंधन उपलब्धतेबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.
शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये – मा.पालकमंत्री डॉ.हसन मुश्रीफ यांचे आवाहन.

नंदुरबार | दि. 04 जून 2026
खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी तयारी, बियाणे-खतांचा साठा तसेच इंधन उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक पार पडली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी अपुऱ्या किंवा वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले.

बैठकीस आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यंदा बहुतांश भागात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याने कृषी विभागाने गावागावांत जनजागृती करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील सुमारे २.९७ लाख हेक्टर क्षेत्रासाठी आवश्यक बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून अतिरिक्त पुरवठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे. खतांचा पुरेसा साठा राखून ठेवण्यात आला असून संभाव्य टंचाई टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत.

बैठकीत पोषक तृणधान्ये (मिलेट्स) उत्पादन वाढ, मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याबाबतही समाधानकारक स्थिती असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील ९१ पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवाव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
Nandurbar #Kharif2026 #DrMittaliSethi #HasanMushrif #Agriculture #FarmersFirst #SeedAvailability #FertilizerManagement #FuelSupply #MilletsMission #DistrictAdministration #NandurbarNews #KharifPreparation #PublicAwareness #MaharashtraGovernment
- 0
- 0
- 0
- 0





