नंदुरबार

नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नकोमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको
मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

नंदुरबार, दिनांक 26 मे 2026 (जिमाका वृत्त) :
नंदुरबार येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाच्या कामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी बांधकामाची सद्यस्थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा तसेच प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, संबंधित अधिकारी तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, नंदुरबारसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना आवश्यक गती देत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

महाविद्यालयाच्या कामांसाठी आवश्यक रस्ते, वीज व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता आणि संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून नागरिकांना लवकरात लवकर आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये, निधी वितरण व प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया गतिमान करावी, असे सांगतानाच अलिबाग, वाशिम, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *