
नंदुरबार तालुक्यात भांगडा येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
इंडियन ग्रामीण सर्विसेस व ए. एस. के. फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील भांगडा येथे वार्षिक सभेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर इंडियन ग्रामीण सर्विसेस व जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथील रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमास समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत १५ गावांतील गाव विकास समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री. पंकज पाटील, श्री. आर. डी. पाटील, उपकृषी अधिकारी श्री. मनोज कोकणी, ग्राम महसूल अधिकारी सौ. ऐश्वर्या वसावे, श्री. रोहित लोहार (अफार्म संस्था), सरपंच श्री. तेडग्या वळवी, सौ. रजनीताई सुनील वसावे तसेच पोलीस पाटील श्री. मानसिंग वसावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात समृद्ध किसान प्रकल्पाचे टीम लीडर श्री. प्रवीणकुमार अहिरे यांनी प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला तसेच शासकीय विभाग व विविध संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जीविका मित्रांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
रक्तदान शिबिरात इंडियन ग्रामीण सर्विसेसची टीम, ए. एस. के. फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी रक्तकेंद्राच्या सौ. किरण मेंढे (समुपदेशक) यांनी रक्तदानाचे महत्त्व, त्याचे फायदे तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करत जनजागृती केली.
या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून अशा शिबिरांमुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहसीन मनियार यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. भानुप्रिया पाडवी यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. यश सोनवणे, श्री. धनराजसिंग वळवी, कु. भानुप्रिया पाडवी, कु. शीतल शाक्य तसेच १५ गावांतील जीविका मित्रांनी विशेष परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





