
‘श्री गंगा दशहरा उत्सव’ साजरा तळोदा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान आणि नदी पूजन सोहळा संपन्न

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
तळोदा येथील श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, (दिंडोरी प्रणीत) आध्यात्मिक विकास मार्ग व दिंडोरी येथील परमपूज्य गुरुमाऊलींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तळोदा येथे ‘श्री गंगा दशहरा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्सवाचे औचित्य साधून आज सकाळी ठीक ८ वाजता हातोडा येथील तापी नदीपात्रावर तळोदा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान आणि नदी पूजन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेविका मीराबाई राजू कोळी व नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्या हस्ते तापी मातेची मनोभावे आरती करून मानसन्मान करण्यात आला.

याप्रसंगी तळोदा केंद्रातील महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी एकत्र येत तापी नदीचा परिसर कचरामुक्त केला. तसेच “यावर्षी संपूर्ण देशात व राज्यात उत्तम पर्जन्यमान व्हावे; नदी, नाले, तलाव, विहिरी पाण्याने ओसंडून वाहू देत आणि बळिराजा सुखावू दे,” असे साकडे सेवेकऱ्यांनी तापी मातेला घातले.श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणीत) सेवा मार्गाच्या वतीने केवळ आध्यात्मिक हेतू न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून ‘गंगा दशहरा उत्सवाचे अभियान’ 17 ते 25 मे दरम्यान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत जीवन दायिनी गोदावरीसह सर्वच नद्यांचा मानसन्मान व संवर्धन केले जात आहे. जनसामान्यांना नद्यांचे महत्त्व पटवून देणे, नद्या प्लास्टिक व कचऱ्यापासून मुक्त करणे, आणि नद्यांचे प्रवाह अखंड चालू ठेवणे हा या नदी अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त नद्या वारसा म्हणून देता येतील. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत गंगा दशहरा सप्ताह अभियाना सोबत केंद्रातील सेविकाऱ्यांनी एकत्र येत जलसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा देखील घेतली.
“नद्या या आपल्या संस्कृतीच्या आणि जीवनाच्या खऱ्या वाहिन्या आहेत. परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रेरणेने स्वामी समर्थ केंद्राने तापी नदीच्या स्वच्छतेसाठी उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. प्रशासनाच्या वतीने या पवित्र कार्याला आमचे नेहमीच सहकार्य लाभेल. नागरिकांनीही नद्यांमध्ये कचरा न टाकता या अभियानात सामील व्हावे.”
— भाग्यश्री चौधरी (नगराध्यक्षा, तळोदा नगरपालिका)
“परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली सेवेकऱ्यांनी केवळ आध्यात्मिक साधना न करता राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेतला आहे. नद्या स्वच्छ राहिल्या तरच मानवी जीवन निरोगी आणि समृद्ध राहील. येणाऱ्या पिढीला शुद्ध पाणी आणि सुंदर नद्यांचा वारसा देणे हे आपले आद्य कर्तव्य असून, हे जनआंदोलन आम्ही असेच पुढे चालू ठेवणार आहोत.”
— तळोदा केंद्र प्रतिनिधी (श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र)
- 0
- 0
- 0
- 0





