Sports महाराष्ट्र

पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम. ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत…

पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम… ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत...

 

जिद्द, कठोर मेहनत आणि अपराजेय इच्छाशक्तीच्या बळावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या कु. मनस्वी विशाल पिपरे हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय रचला आहे. पांढरकवडा ते वणी असा तब्बल ५० किलोमीटरचा स्केटिंग प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण करत तिने एक ऐतिहासिक कामगिरी साकारली. सकाळी ८ वाजता पांढरकवडा येथून या थरारक व प्रेरणादायी प्रवासास सुरुवात झाली. या प्रसंगी आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई तोडसाम तसेच ठाणेदार लहू तावरे यांच्या हस्ते मनस्वीचा प्रारंभी शाल-श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात तिला शुभेच्छा दिल्या.

पांढरकवडा–वणी मार्गावरील धारणा, करंजी, कोठोडा, बुरांडा, खापरी, हटवांजरी, खडकी, घोडदरा व मारेगाव या प्रत्येक गावात मनस्वीचे फुलांच्या वर्षावात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, विद्यार्थी, सामाजिक संस्था व युवकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत तिला उत्स्फूर्त दाद दिली. करंजी येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य अभिनंदन करण्यात आले.

स्वगावी बोटोनी (ता. मारेगाव) येथे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे यांनी “मारेगाव तालुक्याच्या मुलीने गिनीज बुकमध्ये नाव कोरून संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे,” असे गौरवोद्गार काढत तिच्या कामगिरीचे कौतुक केले. मारेगाव येथील मार्डी चौकात तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन मनस्वीचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य हेमंत चौधरी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तिचा उत्स्फूर्त गौरव सोहळा पार पडला.

वणी येथे पोहोचल्यानंतर विजयराव मुकेवार ( अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ ), राजू उंबरकर ( पक्षनेते, मनसे ) तसेच लवलेश लाल ( अध्यक्ष, रोटरी क्लब ) यांच्या हस्ते मनस्वीचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. मूळची बोटोनी ( ता. मारेगाव, जि. यवतमाळ ) येथील रहिवासी असलेली कु. मनस्वी पिपरे सध्या पुणे येथे वास्तव्यास असून तिच्या या नेत्रदीपक यशामागे प्रशिक्षक विजय मलजी यांचे मोलाचे मार्गदर्शन, काटेकोर सराव व अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत.

मनस्वीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी दिशा व प्रेरणा मिळाली असून, महाराष्ट्राची क्रीडा ओळख अधिक भक्कम होत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. तिचा हा पराक्रम आगामी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *