
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन संपन्न

नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व पुढील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने दि. १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन (Conclave) आयोजित करण्यात आले. हे संमेलन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

या संमेलनास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गटविकास अधिकारी, अभ्यासिका वापरणारे युवक–युवती, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, वाचनालय व्यवस्थापन समितीतील युवक प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संमेलनादरम्यान ग्रामीण वाचनालयांच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा व अडचणी जाणून घेत ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमात युवकांचा सक्रीय सहभाग वाढविणे, तसेच वाचनालयांचे समुदाय-आधारित व युवक-नेतृत्वाखालील व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी प्रत्येक अभ्यासिकेसाठी व्यवस्थापन समित्या स्थापन करून युवकांना निर्णयप्रक्रियेत थेट सहभागी करण्याचे निर्देश देण्यात आले.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार, सुरक्षित व प्रेरणादायी अभ्यासाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणारा ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ हा उपक्रम ग्रामीण भागातील वापरात नसलेल्या शासकीय इमारतींचे ज्ञानकेंद्र व अभ्यासिकांमध्ये रूपांतर करून शिक्षणाच्या संधी वाढवत आहे.
प्रशासन व युवक यांच्यातील थेट संवाद, सहभागात्मक नियोजन व सामूहिक प्रयत्नांमुळे हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात नवा आशेचा किरण ठरत असून, भविष्यात अधिक प्रभावी परिणाम साधण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
#Collector Office Nandurbar #RuralEducation #TribalEducation #YouthParticipation
- 0
- 0
- 0
- 0





