
गेवराईत पोलिसांचा छापा: ११ लाख ९८ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व मुद्देमाल जप्त; दोन आरोपी जेरबंद
बीड | सप्त नगरी न्युज ब्युरो
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील गुटखा आणि अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. गेवराई पोलिसांनी शहरात छापा टाकून मानवी आरोग्यास घातक असलेला सुगंधित तंबाखू, मावा बनवण्याचे साहित्य आणि दोन वाहनांसह एकूण ११ लाख ९८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी गेवराई पोलिसांना शहरातील ‘शानदार पान सेंटर’ येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मावा आणि सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने एक विशेष पथक तयार केले आणि दुकानावर छापा टाकला.
समीर मेहबुब शेख (वय ३९, रा. पांढरवाडी फाटा, गेवराई), अमजद जाफर शेख (वय ४१, रा. कोरबु गल्ली, गेवराई) या छापेमारीत पोलिसांनी या दोन इसमांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मावा तयार करण्यासाठी लागणारे मिश्रण, सुगंधित तंबाखू, सुपारी, चुना आणि मावा तयार करण्यासाठी वापरले जाणारे दोन मिक्सर जप्त केले. यासोबतच हा माल विक्रीसाठी वापरली जाणारी एक स्विफ्ट कार आणि एक इलेक्ट्रिक दुचाकी (PRAISE PRO) असा एकूण ११,९८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई, ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि संतोष जंजाळ, पोउपनि राम खोत, पोलीस कर्मचारी हंबर्डे, जितेंद्र ओव्हाळ आणि महिला पोलीस कर्मचारी कोंता यांनी यशस्वी केली. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे गेवराई तालुक्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





