अहिल्यानगर

शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ‘हिरकणी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कौतुक; घनकचरा प्रकल्प व जलकुंभाचा घेतला आढावा

शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

‘हिरकणी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कौतुक; घनकचरा प्रकल्प व जलकुंभाचा घेतला आढावा

अहिल्यानगर|सप्त नगरी न्युज ब्युरो

अहिल्यानगर, दि. १४ : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शेवगाव तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनींची पाहणी करून उपाययोजनांचे निर्देश दिले; तसेच ग्रामीण महिलांनी उभारलेल्या उद्योग उपक्रमास भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

शेवगाव नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पा’ची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. शहराच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या कामाची पाहणी करून त्यांनी कामाचा दर्जा व सद्यस्थिती जाणून घेतली. ही कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामीण भागातील महिलांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या ‘हिरकणी कृषी सेवा केंद्रा’स जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जून भेट दिली. महिलांनी कृषी क्षेत्रात सुरू केलेल्या या उद्योगाची माहिती जाणून घेत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उद्योग वाढीसाठी आवश्यक असणारे तांत्रिक साहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी महिलांना मौलिक मार्गदर्शन केले.

शेवगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका खरडगाव परिसराला बसला होता. येथील पुराच्या पाण्यामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ही नापीक झालेली जमीन पूर्ववत करून पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबत त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या.

​या दौऱ्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#DistrictCollector #Shevgaon #Ahilyanagar #WomenEmpowerment #Agriculture #Development #Maharashtra

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *