जालना

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून समाजाला योग्य दिशा द्यावी- ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करून समाजाला योग्य दिशा द्यावी- ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे

जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा

जालना, / सप्त नगरी न्युज ब्युरो

आजच्या डिजिटल पत्रकारितेच्या युगात विधायकतेची जोड देत सकारात्मक पत्रकारिता करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी केले आहे.
                          

                   जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी (ता. 6) येथील पत्रकार भवनात दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून, जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ पत्रकार श्री. पायगव्हाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख, माजी अध्यक्ष अब्दुल हाफिज, ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव पाटील, विनायकराव दहातोंडे, ओमप्रकाश शिंदे, विलास खानापुरे, कार्याध्यक्ष किशोर आगळे, उपाध्यक्ष अभयकुमार यादव, सरचिटणीस नारायण माने, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, संतोष सारडा, धनंजय देशमुख, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          

               यावेळी बोलतांना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे म्हणाले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी २०० वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ६ जानेवारी १८३२ साली दर्पण नावाचे वर्तमानपत्र सुरु करून, मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. तेंव्हापासून तर आजपर्यंत पत्रकारितेत अनेक स्थित्यंतरे आली आहेत. पूर्वी पत्रकारिता एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून केली जात होती. नंतर पत्रकारितेत आधुनिक तंत्रज्ञान आले. सध्याच्या आधुनिक पत्रकारितेचा उपयोग जबाबदारीने करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

     

                यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल हाफिज म्हणाले कि, अलीकडे पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वेगाने बदल झालेले आपण पाहत आहोत. पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात भांडवलदारांचा शिरकाव झालेला दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल कि नाही? याची भीती आहे. . पत्रकारितेवरील जनतेचा विश्वास कमी होत चालला असून, पत्रकार बांधवांनी समाजातील सर्व घटकाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन अब्दुल हाफिज यांनी केले. जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून, पत्रकारांच्या सुखदुःखात आपण कायम सोबत असल्याचे अब्दुल हाफिज यांनी सांगितले.

          

          यावेळी ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव पाटील यांनी जुन्या आणि बदलत्या काळातील पत्रकारितेवर भाष्य केले. पत्रकारांनी नीतिमूल्यांची जपवणूक करून पत्रकारिता करावी, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी अध्यक्षीय समारोप पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांनी केले. अभयकुमार यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास सुबोधकुमार जाधव, लहू गाढे, विनोद काळे, महेश देशपांडे, अंकुश गायकवाड, प्रताप गायकवाड, जावेद तांबोळी, शेख गनी, शरद खानापुरे, बाबासाहेब कोलते, शांतीलाल बन्सवाल, आशिष रसाळ, सीताराम तुपे, राहुल गायकवाड, शेख मतीन यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार भवनाच्या डागडुजीसाठी आर्थिक मदत
पत्रकार भवनाची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अब्दुल हाफिज यांनी ५१ हजार रुपयांचा निधी जाहीर करून तो तात्काळ कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव पाटील यांनी ५००१ रुपये, छायाचित्रकार शरद खानापुरे यांनी १००० रुपयांचा निधी सुपूर्द केला. याशिवाय, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पयगव्हाणे, विनायकराव दहातोंडे, फकिरा देशमुख यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये आणि अभयकुमार यादव यांनी ५ हजार रुपयांचा मदत निधी देण्याचे जाहीर केले आहे. यावेळी पत्रकार भवनाच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी सढळ हस्ते मदत देणाऱ्या पत्रकार बांधवाचे पत्रकार संघचाकडून आभार मानण्यात आले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *