
रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार
गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत

पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो
पुणे शहरातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ पूना आणि जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी पबमॅटिक यांच्यात आज (दि. २९) सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पांतर्गत (सीएसआर) महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमाद्वारे गरजू बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंड संचलित आळंदी येथील मुलींच्या अंधशाळेला शैक्षणिक व पायाभूत सुविधांसाठी मदत केली जाणार आहे.
समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून रोटरी क्लब ऑफ पूनाचे अध्यक्ष रोहित मित्रा आणि पबमॅटिकचे सहसंस्थापक मुकुल कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. रोटरीचे माजी प्रांतपाल आणि रोटरी क्लब ऑफ पूनाचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर यांच्या पुढाराकारातून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रसंगी पबमॅटिकचे मुख्य वित्तीय अधिकारी संदीप बच्चूवार आणि नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंडच्या प्रवक्त्या सकिना बेदी उपस्थित होते.
पबमॅटिकचे सह-संस्थापक मुकुल कुमार म्हणाले, सामंजस्य कराराच्या माध्यमातून गरजू लहान मुलांच्या हृदयावरील महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत दिली जाणार आहे. तसेच आळंदी येथील मुलींच्या अंधशाळेसाठी अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक पायभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ पूनाचे अध्यक्ष रोहित मित्रा म्हणाले, रोटरी क्लब ऑफ पूना १९३६ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी असलेल्या पबमॅटिकने या कार्यात मदतीचा हात दिल्याने सामाजिक सेवेचा व्यापक विस्तार होण्यास सहकार्य लाभणार आहे.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, या सामंजस्य करारामुळे पुण्यातील अनेक गरजू बालकांना जीवनदान मिळेल तसेच अंध विद्यार्थिनींच्या शिक्षणाला नवी दिशा प्राप्त होईल.
- 0
- 0
- 0
- 0





