शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्रोपचार सुविधा व मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

जळगाव दिनांक : ०६ नोव्हेंबर
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नेत्र विभागातील युनिट्स आणि मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाचे (PICU) लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन व वस्त्रोद्योगमंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार मा. श्री. नंदकिशोर महाजन, आमदार मा. श्री सुरेश भोळे, जिल्हाधिकारी, महापौर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मॉड्युलर बाल अतिदक्षता विभाग (PICU)
एक महिना ते १२ वर्षे वयोगटातील गंभीर आजारी बालकांसाठी श्वसनविकार, न्यूमोनिया, सेप्सिस व विषबाधा यांसारख्या आजारांवर अत्याधुनिक अतिदक्षता व आपत्कालीन उपचारांची सुविधा उपलब्ध.

अत्याधुनिक नेत्र विभाग
आधुनिक नेत्रतपासणी, निदान व शस्त्रक्रियांसाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, फंडस कॅमेरा, लेसर, व्हिज्युअल फील्ड ॲनालायझर व फेको इमल्सिफिकेशन प्रणाली यांसारखी उपकरणे उपलब्ध.

नेत्रदानासाठी विशेष रुग्णवाहिका
नेत्रदान, नेत्रपटल संकलन व जनजागृतीला चालना देण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची सुविधा.

या सुविधांमुळे जळगाव जिल्ह्यातील बालकांना अतिदक्षता उपचार आणि नागरिकांना आधुनिक नेत्रोपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
- 0
- 0
- 0
- 0





