यवतमाळ

‘मिशन उभारी’ अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी भेट पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते वितरणअनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपमिशन उभारी पोर्टलद्वारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत

‘मिशन उभारी’ अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी भेट

पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते वितरण
अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप
मिशन उभारी पोर्टलद्वारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत

यवतमाळ, दि. ५ : जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मिशन उभारी उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी सणानिमित्त भेट तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांना पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाला खासदार संजय देशमुख, जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मून, नगर प्रशासन सहायक आयुक्त येमाजी धुमाळ, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय, अनुकंपा उमेदवार, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संजय राठोड म्हणाले, शेतकरी आत्महत्या ही दुःखाची आणि वेदनादायी बाब आहे. संकटग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाचा मिशन उभारी हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उदयास येत आहे.

या कुटुंबांतील मुलांचे शिक्षण, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, रोजगाराच्या संधी आणि कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन यावर विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी अनुकंपा नियुक्तीबाबतच् उदाहरण देत सांगितले की, अनुकंपा नियुक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाचे शासन निर्णय अंमलात असल्याने अडचणी येत होत्या. याबाबत राज्य शासनाचे एकत्रित धोरण असावे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूण दिली.

त्यानंतर अभ्यास करुन राज्य शासनाने अनुकंपा नियुक्तीसंदर्भात एकच धोरण ठरवून शासन निर्णय लागू केला असल्याचे स्पष्ट केले. तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्त आदेश देण्यात आलेल्या उमेदवारांना शासन सेवेत आल्यानंतर जनतेसाठी प्रामाणिकपणे, जबाबदारीने काम करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

खासदार संजय देशमुख म्हणाले, शेतकरी आत्महत्याबाबत चिंता आहे. जिल्हा प्रशासनाचा मिशन उभारी उपक्रम कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

कर्जमाफीचा लाभ, दुष्काळ अग्रीम मदत गतीने दिले जात आहे. ही मदत मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत दोन काऊंटर सुरु कण्यात आले असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मिशन उभारी उपक्रमाची माहिती दिली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या घराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार वारसांना मदत देण्यात येत असल्याची माहिती दिली. मिशन उभारी पोर्टलवर मदत व देणगी देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

या पोर्टलद्वारे थेट खात्यात पैसे जमा केले जातात, देणगीदारांना प्रमाणपत्र दिले जाते. दुष्काळसंदर्भात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरु आहेत. शेतकऱ्यांना ५ हजार रुपयाची अग्रीम मदत देण्याची प्रक्रिया गतीने सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली.

या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मिशन उभारी अंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त शिलाई मशीन, किराणा किट, साडी, मुलाकरिता कपडे भेट देण्यात आले.

यामध्ये नेर आणि महागाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. यासोबतच मिशन उभारी पोर्टलवर आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या संघटना, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

विविध विभागात ५० उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच ६ जणांना वन हक्क धारक प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसिलदार आदित्य शेंडे, आभार निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले.

मिशन उभारी पोर्टलद्वारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन उभारी पोर्टल सुरु केले आहे. याद्वारे सर्व्हेक्षण करण्यैत आलेल्या जिल्ह्यातील ८१४ कुटुंबियांपैकी सुमारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत थेट पोहचवण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *