तळोद्यात वाढत्या चोरीच्या घटनांत वाढ, व्यापाऱ्यांची आमदारांकडे धाव; प्रशासनालाही निवेदन
सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी

तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरात वाढत्या घरफोडी, दुकानफोडी व चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तळोदा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांनी आमदार राजेश पाडवी यांची भेट घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून. चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. तहसीलदार पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत, तसेच अपुऱ्या पोलीस मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरात पोलीस मित्र नियुक्त करून त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यामुळे शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होईल, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. या मागण्यांबाबत आमदार राजेश पाडवी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संमती दर्शविल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार यांनी सांगितले.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार, गौतम जैन, मनोज भामरे, मुकेश जैन, मुकेश वाणी, योगेश सोनार, गणेश सोनार, तुषार सोनार, मनोज सोनार, दिलीप सेठिया, प्रकाश जैन, कांतीलाल जैन, हंसराज जैन, अश्विन सोनार, धनराज जैन, जालंदर भोई, हुजेफा बोहरी आदी व्यापारी उपस्थित होते. शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
- 0
- 0
- 0
- 1





