नंदुरबार

शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे

शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे

नंदुरबार, दिनांक 02 जुलै :
पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यात अंडी उत्पादन व्यवसायास चालना देण्यासाठी क्लस्टर पद्धतीने कुक्कुटपालन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण योजनेसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांकडून (FPO/FPC) अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. संजय खाचणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जुलै 2026 पर्यंत असून स्थानिक स्तरावर पोषणमूल्ययुक्त अंड्यांची उपलब्धता वाढविणे, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रस्तावित योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (DPDC) जिल्हा विकास आराखड्यांतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प खर्चाच्या मंजूर रकमेपैकी 90 टक्के अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, तर उर्वरित 10 टक्के हिस्सा लाभार्थी संस्थेला स्वतः उभारणे बंधनकारक राहील. हे अनुदान शासनाने निश्चित केलेल्या अटी व शर्तींनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केले जाईल.

लाभार्थी पात्रता व अटी:

  • संस्था नोंदणी: कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी (FPO/FPC) किंवा संबंधित तालुक्यातील नोंदणीकृत महिला बचत गट असावा.
  • जमीन व पायाभूत सुविधा: प्रकल्पासाठी किमान 0.50 एकर क्षेत्रफळाची जमीन उपलब्ध असावी. तसेच प्रकल्प स्थळी कायमस्वरूपी पाणी आणि वीज सुविधा असणे आवश्यक आहे.
  • बँक प्रमाणपत्र: लाभार्थी हिस्सा (10 टक्के) उपलब्ध असल्याबाबत बँकेचे ‘तत्त्वतः मंजुरीचे पत्र’ (‘In-Principle Sanction Letter’) किंवा ठेव प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • ना हरकत दाखला: संबंधित ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला (NOC) आवश्यक राहील.
  • प्राधान्य: कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलेल्या किंवा या व्यवसायाचा पूर्वअनुभव असलेल्या संस्थांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.

अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धती:
इच्छुक पात्र संस्थांनी आपले अर्ज उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, पात्र अर्ज अंतिम निवडीसाठी जिल्हास्तरीय निवड समितीसमोर ठेवले जातील. अंतिम निवड झालेल्या संस्थांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क:
योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील (तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव) ‘तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी’ किंवा ‘उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार’ येथे संपर्क साधावा, असेही आवाहन पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. खाचणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *