
अक्कलकुवा आगार व्यवस्थापकांचा सकारात्मक प्रतिसाद; युवा क्रांती संघटनेच्या निवेदनानंतर अवघ्या ३० मिनिटांत बस फेऱ्या सुरू!
अक्कलकुवा|सप्त नगरी न्यूज ब्युरो
प्रशासकीय समन्वय आणि जनशक्तीची ताकद काय असते, याचा प्रत्यय आज अक्कलकुवा येथे आला. युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटना यांच्या निवेदनानंतर अक्कलकुवा–जमाना–धडगाव मार्गावरील बंद असलेल्या बस फेऱ्या अवघ्या ३० मिनिटांत पुन्हा सुरू करण्यात आल्या.

गेल्या काही दिवसांपासून सकाळी ०९:३० वा. अक्कलकुवा–धडगाव आणि दुपारी ०३:०० वा. जमाना–असली या फेऱ्या तांत्रिक कारणास्तव बंद होत्या. परिणामी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते तसेच कामगार व नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले.
आगार व्यवस्थापकांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाशी समन्वय साधून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या सकारात्मक आणि सहकार्याच्या भूमिकेमुळे केवळ अर्ध्या तासात बस फेऱ्या पुन्हा मार्गस्थ करण्यात आल्या. यामुळे प्रवासी, विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदन देतेवेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. दिपक वसावे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पंकज तडवी, अक्कलकुवा तालुका संघटक महेश पाडवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
“प्रशासनाने जर अशाच प्रकारे सकारात्मक समन्वय ठेवला आणि सहकार्याची भूमिका घेतली, तर जनतेचे प्रश्न सुटायला वेळ लागत नाही. आगार व्यवस्थापकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो,” अशी भावना ॲड. दिपक वसावे यांनी व्यक्त केली.
- 2
- 0
- 0
- 0





