
शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू
धुळे, दि. 9 जून 2026 (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील एकूण 29 शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये (16 मुलांचे व 13 मुलींचे) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सन 2026-27 साठी सर्व वसतिगृहातील ज्युनिअर कॉलेज (इयत्ता 12 वी) विद्यार्थ्यांच्या नूतनीकरण प्रवेशासाठी तसेच प्री-मॅट्रिक (इयत्ता 8 वी) नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आणि इयत्ता 9 वी व 10 वीच्या जुने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
प्रवेश अर्ज भरताना मागील वर्षाची गुणपत्रिका, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, प्रवेश पावती, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याच्या पासबुकची प्रत, वैद्यकीय दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.
.
.
Tribal Development Department, Government of Maharashtra
hosteladmission2026
adivasihostel
- 0
- 0
- 0
- 0





