
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार
:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
धुळ्यात सुवर्ण महोत्सव सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न

धुळे, दि. 7 मार्च, 2026 (जिमाका वृत्त): शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे येथे सुवर्ण महोत्सव सोहळा तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज दुपारी झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले बोलत होते. या कार्यक्रमांस राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महापौर मायादेवी परदेशी, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उपमहापौर ज्योत्सना पाटील, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, वेस्ट खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र निळे, सचिव शशिकांत पाटील, सी.डी.सी.सदस्य ॲड.जितेंद्र निळे, प्राचार्य डॉ.विजय बहिरम आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या विचारांवर आधारित शिक्षण देण्याचे काम हे महाविद्यालय अनेक वर्षांपासून करत आहे. विधी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक होत आहे. या महाविद्यालयातून अनेक गुणी विधीज्ञ घडले असून अनेक विद्यार्थी न्यायाधीश झाले आहेत. देशात व राज्यात वकिलांची मोठ्या प्रमाणावर गरज असून विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी महानगरपालिकेमार्फत जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री श्री. रावल यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील. तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, सामाजिक न्याय, समता आणि बंधुभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने रावसाहेब अशोक निळे यांनी या संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून या महाविद्यालयातून देशाला अनेक सक्षम न्यायाधीश व वकील मिळाले आहेत. खानदेशासह देशभरात विधी शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेने केले असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या ध्येयाने कार्य करत आहे. विधी महाविद्यालयाच्या विस्तारासाठी तसेच संस्थेस निधीसाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, संस्थेचे अध्यक्ष श्री. निळे, प्राचार्य डॉ. बहिरम, तसेच माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





