जळगाव नंदुरबार

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर

जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) –: जळगाव जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या “आदिवासींची होळी” या माहितीपटाला बहुरंग, पुणे आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये उत्कृष्ट संस्कृती संवर्धनपट (माहितीपट) पुरस्कार जाहीर झाला आहे.

बहुरंग, पुणे आयोजित या महोत्सवात देश-विदेशातील आदिवासी संस्कृती, परंपरा, रूढी व वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणारे विविध लघुपट सादर करण्यात आले. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील “आदिवासींची होळी” या माहितीपटाने आपली वेगळी ओळख निर्माण करत उत्कृष्टतेचा मान पटकावला.

या माहितीपटामधून आदिवासी समाजातील पारंपरिक होळी उत्सव, त्यामागील सांस्कृतिक वारसा, लोकपरंपरा व सामाजिक ऐक्य यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.

हा माहितीपट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून यासाठी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, दिग्दर्शक मुबारक तडवी, मुराद तडवी, मजीत तडवी तसेच स्थानिक आदिवासी बांधवांचा मोलाचा सहभाग लाभला आहे.

पुणे येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात TRTI, पुणे यांच्या आयुक्त श्रीमती मंजिरी मनोलकर, दृश्यंम चित्रपटाचे कलाकार सोमण, दूरदर्शनचे संचालक बागल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे तसेच बहुरंग, पुणेचे अध्यक्ष कुंडलिक केदारे यांच्या उपस्थितीत माहितीपट निर्मिती टीमचा गौरव करण्यात आला.

या सन्मानामुळे आदिवासी संस्कृती जपणाऱ्या संपूर्ण समाजात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा प्रकारचे सांस्कृतिक माहितीपट तयार करण्यास प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *