नंदुरबार

नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण

नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आयोजित “४ दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण” कार्यक्रमाचा आज उत्साहात शुभारंभ झाला. ६ ते ९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याला शेतकरी व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्री केदारनाथ कवडीवाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा विभाग चे प्रकल्प संचालक श्री दिपक पटेल उपस्थित होते. यावेळी विश्वस्त सुरेश पाटील, पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे, उद्यानविद्या तज्ञ डॉ. वैभव गुर्वे, राजेश भावसार, संदिप कुवर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात पद्माकर कुंदे यांनी नंदुरबार जिल्ह्यात नर्सरी व्यवसायाच्या मोठ्या संधी असल्याचे सांगत आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार रोपे व जैविक पद्धतींचा वापर करून शेतकरी यशस्वी होऊ शकतात, असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात केदारनाथ कवडीवाले यांनी नर्सरी प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे तयार करून शेतीत नव्या व्यवसायिक संधी निर्माण होतील, असे सांगत “शेतीसोबत व्यवसाय” करण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे दिपक पटेल यांनी आत्मा विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उत्पन्न वाढवावे, असे सांगितले.

दरम्यान, डॉ. वैभव गुर्वे यांनी चार दिवसांच्या प्रशिक्षणाचे सविस्तर वेळापत्रक स्पष्ट केले. या प्रशिक्षणात ऑनलाईन-ऑफलाईन मार्गदर्शन, प्रत्यक्ष नर्सरी प्रात्यक्षिके तसेच नाशिक येथील नामांकित नर्सरी व सह्याद्री फॉर्म्स येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

पहिल्यांदाच देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे अनावरण

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे “प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण” या पुस्तकाचे देहवाली भिली या आदिवासी बोलीभाषेत प्रथमच प्रकाशन. या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत तांत्रिक माहिती सहज समजणार असून ज्ञान अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. स्थानिक भाषा, परंपरा व संस्कृती जपण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. यामुळे युवकांमध्ये वाचनाची आवड वाढून स्थानिक भाषेचा अभिमानही दृढ होणार आहे.

📖 पुस्तकात काय आहे विशेष?

या पुस्तकात प्रो-ट्रे नर्सरी संदर्भातील सर्वसमावेशक माहिती समाविष्ट करण्यात आली आहे:

  • प्रो-ट्रे नर्सरीची संकल्पना व महत्त्व
  • नर्सरीचे ठिकाण, रचना व व्यवस्थापन
  • वाढ माध्यमाची तयारी व निर्जंतुकीकरण
  • बियाणे निवड, बीजप्रक्रिया व पेरणी पद्धती
  • अंकुरण व वाढ व्यवस्थापन
  • रोग व कीड नियंत्रण
  • चांगल्या व कमकुवत रोपांची ओळख
  • विविध भाजीपाला पिकांसाठी लागवड तंत्र
  • हंगामनिहाय नियोजन
  • रोपे पॅकिंग व वाहतूक
  • सरकारी योजना व अनुदान माहिती

हे पुस्तक केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व कृषी क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरती देशमुख यांनी केले. या प्रशिक्षणासाठी धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, स्थानिक भाषेत तयार करण्यात आलेले हे पुस्तक ग्रामीण व आदिवासी भागातील कृषी विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
.
.
.

Nandurbar #CollectorOfficeNandurbar #KrushiVibhag #KVKNandurbar #FarmerTraining #NurseryTraining #AgriDevelopment #TribalDevelopment #DehwaliBhili #LocalLanguage #AgriInnovation #FarmerEmpowerment #RuralDevelopment #MaharashtraGov #AgricultureIndia
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *