
धम्माचे आचरण हा जीवन उन्नतीचा खरा मार्ग – आर्या संघमित्रा यांचे प्रतिपादन
तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- गौतम बुद्ध यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात मानवी कल्याणाची क्रांती घडवून बौद्ध धम्माची स्थापना केली. धम्माचे आचरण केल्याने जीवनाची खरी उन्नती होते, असा संदेश बौद्ध धर्मगुरू आर्या संघमित्रा (नागपूर) यांनी दिला.

तळोदा येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित सामूहिक बुद्ध वंदना व धम्मदेशना कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी नगरसेविका जयश्री महाले, सेवानिवृत्त तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे, सिद्धार्थ महिरे, विजय भामरे, मुख्याध्यापक मुकुंदा बोरसे, शामप्रसाद आगळे, एफ. एम. पावरा, संजय केदार, ॲड. राकेश साळवे, सुनील खैरनार, संदीप मुके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर आर्या संघमित्रा यांनी उपासक-उपासिकांना धम्माचे सखोल मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी बुद्ध, धम्म, संघ आणि पंचशील यांचे महत्त्व स्पष्ट केले. धम्म आणि धर्म या संकल्पना वेगळ्या असून धम्म ही आचरणाची पद्धत आहे, असे त्यांनी सांगितले. धम्माने कर्मकांड नाकारून स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा आणि शांतीचा संदेश दिला असून तो प्रत्येकाने जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्या मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुनील पिंपळे, संतोष केदार, मुकेश कापुरे, हंसराज महाले, महेंद्र सामुद्रे, अशोक गवळे, अरुण कुवर, अरुण आगळे, मनोज इंद्रजीत, सिद्धेश्वर गायकवाड आदींसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





