
सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत
:जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
धुळे, दिनांक 25 फेब्रुवारी, (जिमाका वृत्त) : सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देत सर्व प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विविध विभागांतील प्रलंबित विषयांच्या आढावा बैठकीचे आज दुपारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते बोलत होत्या. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) संदीप पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर (धुळे), शरद मंडलिक (शिरपूर), जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, तहसीलदार अरुण शेवाळे, अपर तहसीलदार वैशाली हिंगे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी विविध प्रशासकीय विभागांतील प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेतला. यात अमरावती धरणातून विखरण पाझर तलावात पाणी सोडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. शिंदखेडा येथे पशुसंवर्धन विभागासाठी योग्य जागेचा शोध घेऊन प्रस्ताव सादर करावा. अक्कलपाडा येथील वाढीव भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी. नगावबारी, धुळे येथील अतिक्रमण धारकांना पात्रतेनुसार नियमानुकूल करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रस्ताव सादर करून पात्र लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून द्यावेत. भूमी अभिलेख विभागाने मंजुरीनंतर प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. शहरातील मौजे धुळे गट क्रमांक 113 येथील अतिक्रमण निष्कासितांच्या पुनर्वसनाचे नियोजन करावे.

महसूल विभागातील ई-क्यूजी कोर्ट प्रणालीअंतर्गत प्रलंबित सुनावण्या तत्काळ घ्याव्यात. सर्कल व तलाठी कार्यालयांसह सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफीस प्रणालीचा प्रभावी वापर करावा. जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना आयएसओ मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. महसूल विभागातील आर.आर.सी. वसुलीची गती वाढवावी. पुरवठा विभागाने नागरिकांना नियमित रेशन उपलब्ध करून द्यावे. चारही तालुक्यातील रास्त धान्य दुकाने यांची वेळोवेळी तपासणी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





