अहिल्यानगर

सुरक्षित इंटरनेट विषयावर व्यापक स्वरूपात जागृती करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते

सुरक्षित इंटरनेट विषयावर व्यापक स्वरूपात जागृती करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिन’ साजरा

अहिल्यानगर, दि. १० : इंटरनेटचा वापर वाढत असताना त्याचा सुरक्षित, सजग आणि जबाबदार वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक माहितीचा गैरवापर तसेच डिजिटल माध्यमांवरील चुकीची माहिती यासारख्या बाबींचा धोका वाढत असल्याने, याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले.

​इंटरनेटच्या सुरक्षित व जबाबदार वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिन’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे उपस्थित होते.

​निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हे शिक्षण, व्यवसाय, सेवा-सुविधा तसेच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, इंटरनेटचा वापर करताना योग्य दक्षता न घेतल्यास नागरिक सायबर फसवणूक, बनावट संदेश, फिशिंग, हॅकिंग, सोशल मीडियाचा गैरवापर यासारख्या प्रकारांना बळी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

​यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे म्हणाले, जनमानसांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित व जबाबदार वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सुरक्षित इंटरनेट दिन’ हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. इंटरनेट वापरताना उद्भवणाऱ्या नवनवीन समस्या, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन धोके व डिजिटल माध्यमांवरील सध्याच्या चिंतांबाबत जनजागृती करणे हा यामागील उद्देश आहे.

​इंटरनेटचा उपयोग सर्वच क्षेत्रांमध्ये माहिती मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, इंटरनेटवरून येणारे अनोळखी कॉल, बनावट लिंक, फसवे संदेश, सोशल मीडियावरील चुकीची माहिती, ऑनलाइन खरेदीतील फसवणूक, तसेच डिजिटल माध्यमांवरून आर्थिक व्यवहार करताना होणारी फसवणूक यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती न देणे, ओटीपी किंवा पासवर्ड कोणासही न सांगणे, तसेच अधिकृत संकेतस्थळे व ॲप्सचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

​ई-बँकिंग, यूपीआय व्यवहार, ऑनलाइन पेमेंट, इंटरनेट बँकिंग करताना विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे असून, सुरक्षित पासवर्ड वापरणे, वेळोवेळी पासवर्ड बदलणे, दोन-स्तरीय सुरक्षा कार्यान्वित करणे, तसेच व्यवहारांची नियमित तपासणी करणे उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
​कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना इंटरनेटवरील सुरक्षितता, सोशल मीडिया वापरातील दक्षता, डिजिटल फसवणुकीपासून बचाव आणि सायबर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी इंटरनेट वापराच्या सुरक्षिततेची शपथही उपस्थितांना देण्यात आली.

​कार्यक्रमास विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SaferInternetDay2026 #CyberSecurity #Ahilyanagar #StaySafeOnline #DigitalIndia #CyberAware #InternetSafety #अहिल्यानगर #सायबरसुरक्षा #सुरक्षितइंटरनेट #जनजागृती #महाराष्ट्रप्रशासन #OnlineSafety

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *