नंदुरबार

‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम

‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम

आजच्या स्पर्धात्मक व झपाट्याने बदलणाऱ्या युगात केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी व व्यवहारज्ञानात्मक कौशल्यांचा विकास होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच विचारातून जिल्हा परिषद शाळा वरूळ, केंद्र शिंदे, तालुका व जिल्हा नंदुरबार येथे “माझी शाळा – माझी कौशल्यशाळा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

उपक्रमाची संकल्पना व गरज:
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थी सक्षम, आत्मनिर्भर व समस्या सोडविण्यास समर्थ बनविणे हा आहे. या धोरणाशी सुसंगत राहून शाळा ही केवळ ज्ञान देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, स्वावलंबन, डिजिटल साक्षरता व उद्यमशीलतेची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे:
या नवोपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करणे, शालेय शिक्षणाला कौशल्याधारित शिक्षणाची जोड देणे, हाताच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देणे, समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे तसेच भविष्यातील करिअरसाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही आहेत.

उपक्रमाची अंमलबजावणी:
या उपक्रमाची अंमलबजावणी जून महिन्यापासून करण्यात आली. सुरुवातीला पालक व विद्यार्थ्यांचा संयुक्त मेळावा घेऊन उपक्रमाची माहिती देण्यात आली. मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास समिती स्थापन करण्यात आली.

विद्यार्थ्यांची आवड, क्षमता व गरजा लक्षात घेऊन वर्गनिहाय कौशल्यांची यादी तयार करण्यात आली. शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यातून एक कौशल्य तास निश्चित करण्यात आला. स्थानिक तज्ञ, कारागीर (सुतार, कुंभार इ.) तसेच पालकांचे सहकार्य घेऊन विविध कौशल्याधारित उपक्रम राबविण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी क्षेत्रभेटींचे आयोजन करण्यात आले. गणपती मूर्ती कारखाना, साखर कारखाना अशा ठिकाणी भेट देऊन प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले. हस्तकौशल्ये, संगणक ज्ञान, बागकाम, स्वच्छता, संवाद कौशल्य, गटकार्य, प्रकल्प पद्धती यांचा प्रभावी वापर करण्यात आला.

उपक्रमाचे परिणाम व निष्कर्ष:
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. शालेय शिक्षण अधिक आनंददायी, क्रियाशील व उपयुक्त बनले आहे. विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, नेतृत्वगुण व स्वावलंबनाची भावना विकसित झाली आहे. अभ्यासासोबत जीवनकौशल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना व पालकांना पटले असून शाळेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे.

‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ हा उपक्रम जि. प. शाळा वरूळ येथे यशस्वीपणे राबविण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकासास मोठी मदत झाली आहे. ही शाळा आज कौशल्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करत असून इतर शाळांसाठीही हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

LifeSkillsEducation #ZPSchool #RuralEducation

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *