शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करा — मंत्री अतुल सावे
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त यशदा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

मुंबई, दि. २४ : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर द्यावा, अशा सूचना इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिल्या.
पुण्यातील यशदा येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग व स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी भटके-विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे व शरद माकर उपस्थित होते.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य तसेच या विभागातील व महसूल विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी २४ व २५ ऑक्टोबर रोजी हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजे उमाजी नाईक व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
मंत्री श्री. सावे म्हणाले की, प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करून क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांमधील समन्वय वाढून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल.
प्रशिक्षण शिबिरात विभागाच्या विविध योजना, शासकीय नियम व कार्यपद्धती, प्रशासकीय जबाबदाऱ्या, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व क्षेत्रीय स्तरावरील समन्वय या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांनुसार सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी बहुजन समाजाच्या कल्याणाच्या योजनांना अधिक गती देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सांगितले.
- 0
- 0
- 0
- 0





