बुलढाणा

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये; गाव पातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश.     

    बुलढाणा, दि. 17 (जिमाका): एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा पाऊस विलंबाने येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल प्रशासनाने सतर्क राहून संभाव्य पाणीटंचाईचे योग्य नियोजन करावे. तसेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पिकांची पेरणी करू नये, यासाठी गाव पातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध महत्त्वाच्या विषयांच्या व्यापक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अमितकुमार दुबे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कौशलेंद्रकुमार सिंग यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने संभाव्य पाणीटंचाईची पूर्वतयारी, लांबणीवर पडलेला पाऊस, खरिपाची पेरणी, बियाण्यांचे नियोजन, नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा आणि शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करून नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत जमिनीत किमान ५ ते ६ इंच पावसाचे पाणी मुरत नाही (योग्य ओल निर्माण होत नाही), तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत घाईगडबडीत पेरणी करू नये. बियाणे वाया जाण्यापासून आणि दुबार पेरणीच्या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी महसूल व कृषी विभागाने गाव पातळीवर जनजागृती करावी, तसेच जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दर्जेदार बि-बियाणांची कमतरता भासू नये म्हणून चोख नियोजन ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी पात्र असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला विनाविलंब व सन्मानपूर्वक कर्जपुरवठा होईल याची पूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना दिल्या. शेतकऱ्यांना बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत आणि कर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेत स्वतंत्र ‘कृषी मदत केंद्र’ सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *